Pune | Thu, 16 April 2026

Ad

विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Sunil Goyal | 3 views
विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वर्धा, (जिमाका) दि. १६ : वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेला जिल्हा आहे. गांधीजींनी त्यावेळी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच देशाला सशक्त, आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर तसेच विश्वविद्यालयाच्या कुलपती प्रो.कुमुद शर्मा उपस्थित होत्या.

 

राष्ट्रपती मुर्मू यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पदक विजेत्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान व शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी करावा. महात्मा गांधी यांच्या आत्मनिर्भरतेच्या विचारांचा उल्लेख करत नवकल्पना, मूल्याधारित शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांच्या आधारावरच विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते, असे त्या म्हणाल्या.

भारतीय भाषांचा अभिमान बाळगून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. इतर भाषांचा विरोध न करता मातृभाषेचा सन्मान राखणे आवश्यक आहे. जगातील कोणतीही भाषा शिका परंतू आपल्या भाषेला प्रथमस्थानी ठेवा. सेवाग्राम आश्रम भेटीदरम्यान महात्मा गांधी यांचा साधेपणा, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेच्या कार्यातून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात विविध राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे आंतरभाषा संवाद घडून येतो. हिंदी ही समृद्ध भाषा आहे. हिंदीसह भारतीय भाषांचा प्रत्येकाने गौरव बाळगला पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी इंग्लंडमध्ये शिकले. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी सामाजिक चळवळ उभारली. परंतू भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींनी भारतीय भाषेलाच प्राथमिकता दिली. हिंदीच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

पदवीदान समारंभात विद्यार्थीनींना अधिक पदके मिळाली. त्यासाठी विद्यार्थीनींचे राष्ट्रपतींनी कौतूक केले. सन 2047 साली देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पुर्ण होणार आहे. स्वातंत्र्यासाठी अनेक महिलांनी आपले योगदान दिले. आता विकसित भारताच्या निर्मितीसोबतच विविध क्षेत्राच्या प्रगतीसाठी युवकांसोबतच युवतींनी देखील खांद्याला खांदा लावून योगदाने द्यावे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, विद्यार्थ्यांनी सदाचार, नैतिकता व सामाजिक उत्तरदायित्व जपत राष्ट्रविकासात योगदान दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कार्यनिष्ठा आणि मानवी मूल्ये जोपासत मागास घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे. डिजीटल युगात हिंदी भाषेची भूमिका अधिक महत्वाची झाली आहे. ती केवळ भाषा नाही तर अभिव्यक्ती आणि संस्कृती, परंपरेचे दर्शन घडविणारे माध्यम आहे, असे राज्यपाल म्हणाले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत राज्य शासन शिक्षण क्षेत्रात रोजगाराभिमुख बदल घडवित असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेले शिक्षण धोरण लवचिक, कौशल्य प्रदान करणारे आणि विद्यार्थी केंद्रीत असल्याचे श्री.बावनकुळे म्हणाले.

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते विविध विद्याशाखेच्या आठ विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पदवी प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलपती प्रो.कुमुद शर्मा यांनी केले. त्यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम, संशोधन उपक्रम आणि विद्यार्थी विकास कार्यक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमास आ.दादाराव केचे, विशेष पोलिस महानिरिक्षक संदीप पाटील, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp