Pune | Mon, 16 March 2026

Ad

विल्सन महाविद्यालय येथील ‘महाराजस्व समाधान शिबिरा’त नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप

Sunil Goyal | 5 views
विल्सन महाविद्यालय येथील ‘महाराजस्व समाधान शिबिरा’त नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप

मुंबई, दि. १४ : शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवर निराकरण करणे हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा मुख्य उद्देश आहे. विल्सन महाविद्यालय, गिरगाव, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विद्यार्थ्यांना, नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि विल्सन महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रदीप अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र तसेच नॉन-क्रीमीलेअर दाखले देण्यात आले. तसेच नवीन रेशन कार्ड मिळविणे, नाव कमी किंवा वाढविणे यासंबंधी अर्ज स्वीकारून कार्यवाही करण्यात आली. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीसाठीही विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.

उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांनी विद्यार्थ्यांना ‘आपले सरकार’ पोर्टलबाबत माहिती देत ऑनलाईन अर्ज करून दाखले मिळवावेत, असे आवाहन केले. एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी या शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनात महसूल विभागाचे तहसीलदार संदीप आवारी, मानसी मार्लेवार, नायब तहसीलदार ज्योती खाबकर, रामकिशन चव्हाण यांच्यासह महसूल अधिकारी व कर्मचारी आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालक यांचे योगदान लाभले.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp