
मुंबई, दि. ६: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या मार्च 2026 या अंकाचे प्रकाशन अपर मुख्य सचिव महसूल तथा अतिथी संपादक विकास खारगे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपलं मंत्रालय या गृहपत्रिकेच्या सदर अंकामध्ये विविध विषयांचा समतोल आणि आशयपूर्ण आढावा सादर करण्यात आला आहे. याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या समकालीन विषयावरील लेखांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञानातील नव्या घडामोडींची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बदलत्या काळाशी सुसंगत अशी विचारप्रवर्तक मांडणी हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.
निसर्ग, समाज, संस्कृती, इतिहास आणि आधुनिक विज्ञान या विविध अंगांचा समतोल साधत, हा अंक वाचकांना विचारप्रवृत्त ठरणारा आहे.
मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचा समावेश या अंकात करण्यात आलेला आहे.
०००
अश्विनी पुजारी/स.सं.
