Pune | Thu, 23 July 2026

Ad

ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम होऊन विकासाला मिळणार गती : मंत्री छगन भुजबळ

Sunil Goyal | 1 views
ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम होऊन विकासाला मिळणार गती : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. २३ जुलै, २०२६ (जिमाका): वीज ही शेती, उद्योग, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची मूलभूत गरज असून ग्रामीण भागाला दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आज कार्यान्वित झालेल्या या उपकेंद्रामुळे अंगुलगाव, तळवाडे, शिवाजीनगर, पांजरवाडी व परिसरातील शेतकरी व नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होऊन कृषी व ग्रामीण विकासाला गती मिळणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

कृषी आकस्मिकता निधी अंतर्गत रु. ३१५.३८ लाख निधीतून येवला तालुक्यातील अंगुलगाव येथे उभारण्यात आलेल्या ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे तसेच ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरच्या कार्यान्वयनाचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, उपकार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, श्री. नलावडे, सहायक अभियंता विशाल पूरकर, श्री. मगर, कनिष्ठ अभियंता राहुल पडेर, सरपंच बाजीराव जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, शेतीच्या प्रगतीसाठी नियमित वीजपुरवठा ही अत्यावश्यक बाब आहे. शेतकऱ्यांना पाणी, वीज, सिंचन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील वीजदाबाची समस्या दूर होऊन शेतीपंपांना अधिक सक्षम व अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत होईल. ते पुढे म्हणाले की, राज्य शासन सौर ऊर्जा, जलविद्युत व पवनऊर्जा यासारख्या पर्यायी ऊर्जास्रोतांच्या वापराला.

प्रोत्साहन देत असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रमही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. भविष्यात स्वस्त, पर्यावरणपूरक आणि शाश्वत वीज उपलब्ध करून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याचेही मंत्री श्री. भुजबळ सांगितले.

0000000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp