
कोल्हापूर, दि. १७: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाची तिमाही आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीमध्ये राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि इतर आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मनुष्यबळाची उपलब्धता, रिक्त पदे, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा सुविधा, १०८ रुग्णवाहिका सेवा, रेफरल व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, “आपला दवाखाना” तसेच इतर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, आरोग्य सेवा ही शासनाची सर्वात महत्त्वाची लोककल्याणकारी सेवा असून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या सर्व आरोग्य योजनांची माहिती गावागावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभाग यांनी समन्वयाने काम करावे.
एमजेपीजेएवाय योजनेचे काम प्रभावीपणे राबवावे, शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतींची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, कॅन्सरवरील तपासणीकरिता शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील आरोग्यविषयक प्रश्न प्रभावीपणे मांडून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे संकलन करून अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्राम पातळी तसेच इतर सर्व समिती यांचे कामकाज प्रभावीपणे करावे. हा उपक्रम आम्ही सर्वत्र महाराष्ट्रभर राबवत असून १ ऑगस्ट रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत याचा भव्य शुभारंभ देखील आम्ही करता आहोत. आरोग्य मंत्री म्हणून मी स्वतः या समित्यांच्या ग्राम पातळी ते उपकेंद्र, पीएचसी, आरएच, एसएचडी पाहणी व भेटी देणार असून यामध्ये आरोग्य सेवा सर्व योजनांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना सुलभ पद्धतीने मिळाव्यात हाच यामागील उद्देश आहे.
मा. स्थानिक आमदार महोदय यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या समितींच्या बैठका दर तीन महिन्यांनी घ्याव्यात. त्याचा अहवाल पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखालील समितीसमोर आढावा होईल. त्यानंतर स्वतः आरोग्य मंत्री म्हणून मी सचिव, आयुक्त, संचालक यांचे स्तरावर बैठक होणार असून सुचविण्यात आलेल्या सर्व प्रस्ताव/ सूचना यावर कार्यवाही होणार आहे. त्यामुळे सर्वांनी अत्यंत सक्रियपणे कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच सुरू असलेल्या सर्व आरोग्य संस्थांच्या बांधकामाबाबत देखील आढावा घेण्यात यावा.
आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान व्हावे यासाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच इतर आरोग्य विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना विनाअडथळा उपचाराचा लाभ मिळेल याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने, संवेदनशीलतेने आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे हे आरोग्य विभागाचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करून नागरिकांच्या तक्रारींना वाव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, औषधांची उपलब्धता, वेळेवर उपचार, रुग्णांशी सुसंवाद आणि पारदर्शक सेवा यावर विशेष भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील विविध आरोग्यविषयक समस्या, ई-संजीवनी, टेली मेडिसिन,पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि आरोग्य सेवांबाबत सूचना मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकीतील निर्णयांची कालबद्ध अंमलबजावणी करून त्याचा सविस्तर अनुपालन अहवाल पुढील तिमाही बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती”ची ही बैठक आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
बैठकीच्या प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी, राधानगरी डॉ. शेटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे जलद निराकरण होण्यास मदत होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली बैठक असून आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीस या सभेस जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर, राधानगरी भुदरगड आजरा पंचायत समिती सभापती सर्व, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. समितीचे सदस्य, राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आजरा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी उपस्थित यांचे आभार मानले.
००००
