
मुंबई, दि. ८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांमध्ये ‘समावेशक कला कार्यशाळा विविधतेचा उत्सव’ या विशेष उपक्रमावर आधारित सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन, मुंबई येथील समन्वयक व कला शिक्षक प्रशिक्षण विभागप्रमुख प्रा. प्रकाश सोनवणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत गुरुवार, दि. ९, शुक्रवार, दि. १० आणि शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. याचबरोबर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित केली जाणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदक सुचेता गरूडे यांनी केले आहे.
आयएएसओडब्ल्यूए, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन, मुंबई आणि राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सक्षमीकरण संस्था (एनआयईपीआयडी) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘समावेशक कला कार्यशाळा – विविधतेचा उत्सव’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. ही कार्यशाळा दि. ७ व ८ एप्रिल २०२६ रोजी कला शिक्षण विभागात यशस्वीरित्या पार पडली. या कार्यशाळेत साकारलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन दि. ९ व १० एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमात १८ हून अधिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला असून, एकूण ४२ दिव्यांग कलाकारांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यशाळेत सर्जनशील चित्रकला सत्रे, कौशल्यविकास उपक्रम, आत्मविश्वास वृद्धी आणि स्व-अभिव्यक्तीस प्रोत्साहन देणाऱ्या विविध कृतींचे आयोजन करण्यात आले.
दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन प्रा. सोनवणे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.
महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांच्या लिंक्स 
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
०००
जयश्री कोल्हे/स.सं.
