Pune | Mon, 06 April 2026

Ad

‘साधना’ सप्ताहातून प्रशासन होणार कर्मयोगी…

Sunil Goyal | 3 views
‘साधना’ सप्ताहातून प्रशासन होणार कर्मयोगी…

केंद्र सरकारच्या क्षमता विकास आयोग आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात दिनांक  2 एप्रिलपासून साधना सप्ताहास प्रारंभ झाला आहे. Strengthning Adaptive Development and Human Aptitude for National Advancement च्या आद्याक्षरांतून SADHANA हा शब्द तयार झाला आहे. साधना सप्ताहामध्ये 2 एप्रिलपासून देशभरात आतापर्यंत 80 लाखहून अधिक कोर्सेसअंतर्गत 1 कोटीपेक्षा अधिक तासाचे प्रशिक्षण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले आहे. राज्यातही साधना सप्ताहाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे हा साधना सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात मंत्रालयीन विभागांपासून जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. राज्यातील सर्व जिल्हे, 32 विभाग आणि 6 विभागीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी या सप्ताहात सहभागी होणार असून, प्रशासनाच्या सर्व स्तरांवर हा उपक्रम राबविला जात आहे. ‘मिशन कर्मयोगी’चा भाग असलेला हा कार्यक्रम पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे.

शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे, त्यांच्या ज्ञानात अद्ययावतता आणणे आणि प्रशासन अधिक परिणामकारक बनवणे, बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर, नव्या धोरणांची समज आणि लोकाभिमुख सेवा देण्याची क्षमता विकसित करणे यावर या उपक्रमात विशेष भर दिला गेला आहे.

या सप्ताहादरम्यान सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी iGOT (Integrated Government Online Training) कर्मयोगी पोर्टलवरील विविध प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे अपेक्षित आहे. प्रशिक्षणासाठी एकूण 50 कोर्स उपलब्ध करून देण्यात आले असून, बिगिनर, इंटरमिडीएट आणि आयगॉट मार्केटप्लस कोर्सेस अशा तीन स्तरावर हे कोर्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बिगिनर लेव्हलसाठी 24 कोर्सेस, इंटरमिडीएट लेव्हलसाठी 13 कोर्सेस आणि आयगॉट मार्केटप्लस लेव्हलसाठी 13 कोर्सेस उपलब्ध केले आहेत. यातील आयगॉट मार्केटप्लस लेव्हलमधील कोर्सेस परदेशातील विद्यापीठातील आहेत. तर अनेक कोर्सेस आयआयटी तसेच गूगल, मायक्रोसॉफ्टने उपलब्ध केले आहेत.

प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने किमान 4 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. हे कोर्स प्रशासनातील विविध अंगांवर आधारित असून, त्यातून दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित होतात. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सेक्युरिटी, सुशासन, नेतृत्त्वगुण, प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आदींच्या अनुषंगाने या कोर्सेसमध्ये माहिती दिली जात असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर फायनल असेसमेंटही करून ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाते.

साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (iGOT पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे) विभागांना मे 2026 मध्ये होणाऱ्या “TECH-वारी 2.0” या कार्यक्रमात प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढून अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

साधना सप्ताहामुळे शासकीय यंत्रणेत एक सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे. नियमित प्रशिक्षणामुळे कर्मचारी अधिक कुशल बनतात, निर्णयप्रक्रिया जलद होते आणि नागरिकांना सेवा देण्याची गुणवत्ता सुधारते. तसेच, डिजिटल माध्यमांचा वापर वाढल्यामुळे कामकाज पारदर्शक आणि सोयीस्कर बनते.

साधना सप्ताह हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून, तो प्रशासनाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचारी अधिक सक्षम, जबाबदार आणि लोकाभिमुख होऊन भविष्यातील विविध तंत्रज्ञानात्मक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होतील.

०००

 

संकलन – संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp