Pune | Mon, 01 June 2026

Ad

दादासाहेब फाळके यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Sunil Goyal | 10 views
दादासाहेब फाळके यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा कलात्मक आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याची पायाभरणी करणारे दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेमाचे आद्य प्रवर्तक मानले जातात. १९१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘राजा हरिश्चंद्र’ या भारतातील पहिल्या पूर्णां चित्रपटाच्या निर्मितीद्वारे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. मर्यादित साधने, तांत्रिक अडचणी आणि आर्थिक आव्हाने असूनही त्यांनी जिद्द, कल्पकता आणि कलात्मक दृष्टीच्या बळावर भारतीय सिनेमाला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला स्वतंत्र ओळख प्राप्त झाली असून आजही त्यांचे योगदान प्रेरणादायी मानले जाते.

हा कार्यक्रम शनिवार, २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता डोंबिवली पूर्व येथील सी. के. पी. सभागृह, राम गणेश गडकरी पथ, कारवा हॉस्पिटलजवळ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून चित्रपट, कला आणि संस्कृतीप्रेमी नागरिकांसाठी हा कार्यक्रम एक विशेष सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.

कार्यक्रम डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि चित्रपट वारशाची माहिती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाचे निवेदन प्राची गडकरी करणार असून निलेश गायकवाड, मृण्मयी भिडे, धनंजय पुराणिक, कैस्तुभ दिवेकर, तेजस मोकल, अर्णव, सुमित आणि स्वप्नील राणे हे कलाकार विविध कलात्मक सादरीकरणातून दादासाहेब फाळके यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास रसिकांसमोर उलगडणार आहेत. अभिनय, निवेदन, संगीत आणि दृश्यात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचे दर्शन या कार्यक्रमातून घडणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी चित्रपट, कला, साहित्य आणि संस्कृतीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

००००

संजय ओरके/विसंअ

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp