
मुंबई, दि. ७ : आयएएसओडब्ल्यूए, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन, मुंबई आणि राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सक्षमीकरण संस्था (एनआयईपीआयडी) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी “समावेशक कला कार्यशाळा – विविधतेचा उत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट च्या कला शिक्षण विभाग, मुंबई येथे दिनांक ८ एप्रिल २०२६ पर्यंत असून, मुंबई व परिसरातील विशेष क्षमताधारक कला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आयएएसओडब्ल्यूए च्या अध्यक्ष मीनाक्षी अग्रवाल, कुलगुरू प्रा. हिम कुमार चॅटर्जी, एनआयईपीआयडी, सिकंदराबादचे संचालक डॉ. बी. व्ही. रामकुमार, कला संचालनालयाचे संचालक डॉ किशोर इंगळे, कुलसचिव शशिकांत काकडे, अन्विता चॅटर्जी, समन्वयक व विभागप्रमुख (कला शिक्षक प्रशिक्षण विभाग) प्रा. प्रकाश सोनवणे, विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. दिपक सिनकर,अधिव्याख्याता शार्दूल कदम व महाविद्यालियातील सर्व अध्यापक उपस्थित होते. तसेच एनआयईपीआयडी प्रादेशिक केंद्र, नवी मुंबईचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. हिम कुमार चॅटर्जी यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी अशा समावेशक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत कला ही स्व-अभिव्यक्ती व सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम असल्याचे नमूद केले. भविष्यातही अशा उपक्रमांना विद्यापीठाचा पाठिंबा राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘आयएएसओडब्ल्यूए’ च्या अध्यक्ष मीनाक्षी अग्रवाल यांनी कार्यशाळेची संकल्पना स्पष्ट करताना दिव्यांग कलाकारांच्या सर्जनशीलतेला वाव देणे, आत्मविश्वास वाढविणे आणि विविध कला प्रकारांची ओळख करून देणे हा उद्देश असल्याचे सांगितले. तसेच कला क्षेत्रात समावेशकता वाढविण्यासाठी पुढील उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेत १८ हून अधिक संस्थांनी सहभाग नोंदविला असून, विविध प्रकारच्या दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे. एकूण ४८ दिव्यांग कला विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी झाले असून, त्यामध्ये बौद्धिक दिव्यांगत्व, ऑटिझम, डाउन सिंड्रोम, बहुविध दिव्यांगत्व, श्रवणदोष, दृष्टीदोष तसेच हालचालींशी संबंधित अडचणी असलेल्या कला विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या उपक्रमांतर्गत सर्जनशील चित्रकला सत्रे, कौशल्य विकास उपक्रम, आत्मविश्वास वृद्धी तसेच स्व-अभिव्यक्तीस प्रोत्साहन देण्यात येत असून, सहभागी कला विद्यार्थ्यांना कला-आधारित करिअर संधींची ओळख करून दिली जात आहे. कार्यशाळेचा समारोप दि ८ एप्रिल रोजी होणार असून, सहभागी कला विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींना संधी, प्रोत्साहन आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास ते समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतात, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. “विविधतेचा उत्सव” हा उपक्रम समावेशक समाज घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चे कला शिक्षक प्रशिक्षण विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रकाश सोनवणे यांनी केले.
०००
