Pune | Mon, 01 June 2026

Ad

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीतून नायर रुग्णालयात अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अँनालायझर; रुग्णांना जलद व अचूक निदान सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 5 views
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीतून नायर रुग्णालयात अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अँनालायझर; रुग्णांना जलद व अचूक निदान सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २२ : मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या सीएसआर निधीतून अत्याधुनिक पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अँनालायझर प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार निदान सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईसारख्या महानगरात सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. नायर रुग्णालयातील नव्या हायटेक बायोकेमिस्ट्री अँनालायझरमुळे रुग्णांच्या तपासणी अहवालांचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून डॉक्टरांना उपचारासंदर्भात जलद निर्णय घेणे शक्य होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता वाढविणे ही राज्य शासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली ही अत्याधुनिक यंत्रणा मोठ्या प्रमाणावरील नियमित तसेच तातडीच्या बायोकेमिकल तपासण्या वेगाने आणि अचूकपणे करण्यास सक्षम आहे. 24 तास कार्यरत असलेल्या सेंट्रल पॅथॉलॉजी लॅबमध्ये ही प्रणाली बसविण्यात आल्याने नमुन्यांच्या तपासणीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल हे मुंबईतील महत्त्वाचे शासकीय वैद्यकीय संस्था असून, येथील बायोकेमिस्ट्री विभाग वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहे. आधुनिक स्वयंचलित अॅनालायझर्सच्या साहाय्याने दररोज मोठ्या प्रमाणावर नमुन्यांची तपासणी करण्यात येते. नव्या उपकरणामुळे प्रयोगशाळेतील कार्यक्षमता, अचूकता आणि अहवाल वितरणाचा वेग अधिक सुधारला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसआर माध्यमातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला सहकार्य करणाऱ्या उद्योग समूहांचेही कौतुक केले. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या सहकार्यामुळे राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होत असून, अशा उपक्रमांमुळे गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp