Pune | Mon, 01 June 2026

Ad

महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

Sunil Goyal | 1 views
महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

मुंबई, दि. १ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस आज सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम व गोवा राज्यांची लोकगीते व लोकनृत्ये सादर केली.

विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या – त्या राज्यांच्या संस्कृती, वेशभूषा, नृत्य व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.

सिक्कीम व गोवा राज्य परस्परांपासून शेकडो मैल दूर असली तरीही दोन्ही राज्यांच्या विविधतेतून एकात्मता दिसून येते असे राज्यपालांनी सांगितले.

सिक्कीम राज्य सुंदर गिरीरांगांनी नटलेले आहे तर गोव्याला सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. दोन्ही राज्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पसंतीची राज्ये ठरली आहेत.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा एकसमानता साजरे करणारा उपक्रम नसून तो विविधता साजरा करणारा उत्सव आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

भारत हा केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला प्रदेश नसून तो विविधांगी संस्कृतींनी सजलेला देश आहे असे त्यांनी सांगितले. गोवा महाराष्ट्राचा शेजारी आहे, आणि दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होते. मुंबईत कामानिमित्त आलेल्या सिक्कीमच्या लोकांनी आपली संस्था निर्माण करावी व परस्परांना सहकार्य करावे असे राज्यपालांनी सांगितले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘मारिया पिता शे’ या गोव्याच्या गीत-नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.

कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर व गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू पुसपति यांचे व्हिडिओ संदेश दाखविण्यात आले, तसेच दोन्ही राज्यांचा इतिहास, वारसा, पर्यटनस्थळे दाखविणारे लघुपट दाखविण्यात आले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी यावेळी राज्यपालांचा सत्कार केला.

कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते. सहायक प्रशासकीय अधिकारी संजय करंगे यांनी आभार प्रदर्शन केले.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp