
मुंबई, दि, ४: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी 3 जून रोजी महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्याचा स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
‘लोकभवन‘ मुंबई येथे ‘वर्मा फाउंडेशन‘ आणि ‘फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र‘ यांच्या सहकार्याने आयोजित केला होता. या संस्थेच्या कलाकारांनी तेलंगणा राज्याची लोकगीते व लोकनृत्ये सादर केली. तेलंगणा राज्याचे पारंपरिक गीत ‘जय जय हे तेलंगणा’, ‘आंदे श्री’ तसेच ‘वंदे शिवम शंकरम’ ही गीते देखील सादर करण्यात आली. तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांचा व्हिडिओ संदेश देखील यावेळी दाखविण्यात आला.

कलाकारांनी रंगीबेरंगी ‘बथुकम्मा‘, ‘बोनालू‘ आणि इतर पारंपरिक नृत्यप्रकारांनी तेलंगणाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सुंदर दर्शन घडविले. नाट्य शिरोमणी शेख नादिया यांचे सादरीकरण विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या कलात्मकतेने आणि भावपूर्ण अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले अशा शब्दांत राज्यपालांनी कौतुक केले. भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘ उपक्रमाचा भाग म्हणून तेलंगणा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता.
भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा, नृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. संपूर्ण देश फुलांच्या हाराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला गेला आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत नसून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या संकल्पनेमागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाचे (एनसीएलटी) माजी न्यायिक सदस्य न्यायमूर्ती (निवृत्त) मदन गोसावी, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष पी. यू. एन. वर्मा, ‘मराठी-तेलगू मंच’चे संस्थापक आणि ‘फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष जगन बाबू गंजी, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विविध संस्थांचे सदस्य उपस्थित होते.
0000
