
नाशिक, दि. ४ एप्रिल (जिमाका वृत्तसेवा ) : ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’च्या अनुषंगाने नाशिक शहरातील धार्मिक, ऐतिहासिक व पायाभूत सुविधा असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांचा आढावा घेतला. भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, पुरातत्व विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, कुंभमेळा प्राधिकारणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, सहाय्यक संचालक अमोल गोटे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, शहर अभियंता संजय अग्रवाल, महावितरणचे सहाय्यक अभियंता शशांक पेंढारकर, कुंभमेळा प्राधिकरणाचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पाहणी दरम्यान प्रादेशिक वस्तू संग्रहालय नाशिक येथे पर्यटकांसाठी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सराफ बाजार पोलीस चौकी येथे सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत, कुंभमेळा काळात प्रभावी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. धार्मिक स्थळांमध्ये श्री बालाजी मंदिर, श्री काळाराम मंदिर, सीता गुंफा आणि गोरेराम मंदिर येथे भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून प्रवेश व निर्गमन मार्ग, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधा यांचे नियोजन अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले. रामसेतू पूल व राम झुला परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना त्यांनी सुरक्षित पादचारी वाहतूक, मजबूत संरचना आणि प्रभावी मार्गदर्शन प्रणाली विकसित करण्यावर भर दिला. तसेच रामकाल पथ परिसरातील सुशोभीकरण व पायाभूत सुविधा विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

मुख्य सचिव श्री. अग्रवाल हे अधिकाऱ्यांसह गोदा आरतीसाठी उपस्थित राहिले.
00000
