
मुंबई, दि. ६ : राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.
मंत्री ॲड. शेलार यांच्या उपस्थितीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी माहिती दिली. यावेळी विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, उपसचिव नंदा राऊत तसेच उपसचिव महेश वाव्हळ उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत गेल्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी या महोत्सवाला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या यशाच्या पार्श्वभूमीवर यंदा चार दिवसाचा हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.
०००
संजय ओरके/विसंअ
