
मुंबई, दि. ८ : आदिवासी बहुल गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ आदी जिल्ह्यांत सध्या धान कापणी सुरू असताना धान उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी अधिक जबाबदारीने काम करावे. तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या योजनांमध्ये महिलांच्या बचत गटांना व युवकांना विशेष प्राधान्य देण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.
धान नुकसानीबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आदिवासी विभाग, अन्न व नागरी पुरवठा, महसूल विभाग व इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले की, आदिवासी विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणारी आधारभूत किंमत खरेदी योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून तिची पारदर्शक अंमलबजावणी केल्यास खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक टाळता येऊ शकते. यासंदर्भात शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे स्थानिक स्तरावर काटेकोर पालन करावे.
धान उत्पादक शेतकऱ्यांनी किती क्षेत्रावर पेरणी केली आहे, याची अचूक माहिती संबंधित विभागांकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. ई-पीक पेरा नोंदींची माहितीही घ्यावी. तांत्रिक नियोजन करून वेळेत अचूक माहिती संकलित करावी. याशिवाय, धान साठवणुकीसाठी पुरेशा गोडाऊनची उभारणी करुन शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजना, महिला सक्षमीकरण योजना आणि स्वयंसहाय्यता बचत गट योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ‘स्टँड अप इंडिया’ योजनेअंतर्गत आदिवासी भागांत उद्योग उभारणीस चालना देऊन कृषी-आधारित प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मूल्यसाखळी प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यावरही त्यांनी भर दिला.
आदिवासी युवकांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आणि राज्य परिवहन महामंडळामार्फत वाहन चालक प्रशिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे निर्देश मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी यावेळी दिले.
०००
श्रीमती अश्विनी पुजारी/ सं.स
