
मुंबई, दि. ७ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील पाणी पुरवठा योजनेची जिल्हा परिषद,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या यंत्रणांनी पाहणी करून याचा अहवाल शासनाकडे सादर करावा असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

मुंबईतील ‘निर्मल भवन’ येथील एमएसआरडीसी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील नळयोजनेच्या समस्येबाबत आयोजित बैठकीत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी इद्रिस मुलतानी, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे दूरदृश्यप्रणालीव्दारे छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्न, पी.एम यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, फर्दापूरचे ग्रामस्थ उपस्थित होते.

ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, सध्या असलेली पाणी पुरवठा योजना नादुरुस्त असल्याने गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणांनी या योजनेची संयुक्त पाहणी करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा.
फर्दापूर ते सावळतबारा ३३ केव्ही लाईनच्या प्रस्तावास मंजुरी देणे, ओव्हरलोड डीपीच्या ठिकाणी नवीन डीपी बसवणे आणि मंजूर उपकेंद्रांची कामे तातडीने सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. विभागाच्या प्रमुखांनी या विषयांवर सादरीकरण करावे आणि बैठकीचे इतिवृत्त दोन दिवसांत सादर करावे, असेही आदेश यावेळी देण्यात आले.
०००
संध्या गरवारे/विसंअ
