Pune | Tue, 07 April 2026

Ad

उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी सरस -२०२६’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींहून अधिक रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल

Sunil Goyal | 2 views
उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी सरस -२०२६’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींहून अधिक रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल

मुंबई, दि.६ : ग्रामीण महाराष्ट्राच्या कष्टाचा सुगंध, कष्टकरी माऊलींच्या हाताची जादू आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यांचा अभूतपूर्व महोत्सव नवी मुंबईच्या वाशी येथे पार पडला. २४ मार्चपासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस-२०२६’ प्रदर्शनाने निरोप घेताना यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले. १३ दिवसांत तब्बल २२ कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक विक्री करून ग्रामीण महिलांनी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उद्योजकतेचा नवा इतिहास लिहिला.

मुंबईकरांनी ४९० स्टॉल्सवर दाखवलेला हा उदंड प्रतिसाद केवळ खरेदीपुरता मर्यादित नव्हता तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेला एक भक्कम आधार ठरला. शेवटचे सहा दिवस तर प्रदर्शनात जनसागराचा महापूर लोटला, ज्यामुळे आयोजकांनाही प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा लागला.

२५ किलोमीटरपर्यंतच्या घरपोच सुविधेमु‌ळे प्रतिसाद

यंदाच्या प्रदर्शनाचे सर्वात मोठे ‘गेमचेंजर’ ठरले ते म्हणजे आयोजकांनी पुरवलेल्या नाविन्यपूर्ण सुविधा. २५ किलोमीटरच्या परिघात मोफत घरपोच सेवा देण्याचा निर्णय महत्वाचा ठरला. आमच्या हातात पिशव्यांचे ओझे नको, असे म्हणणाऱ्या मुंबईकरांनी या सुविधेमुळे पोतीभरुन धान्य, मसाले, सेंद्रिय गुळ आणि हस्तकलेच्या वस्तूंची मनमुराद खरेदी केली. घरपोच सुविधेमुळे खरेदीचा वेग वाढला आणि उलाढालीने १० कोटींचा टप्पा ओलांडून थेट २२ कोटींवर झेप घेतली.

सेलिब्रिटींची साथ अन् डिजिटल प्रतिसाद

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच नामांकित कलाकारांनी हजेरी लावल्याने प्रदर्शनाचा दर्जा उंचावला. अनेक सेलिब्रिटींनी स्टॉल्सवर जाऊन महिलांशी गप्पा मारल्या आणि ‘व्होकल फॉर लोकल’चे महत्त्व पटवून देणारे ‘रील्स’ सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील तरुण पिढीही मोठ्या संख्येने या प्रदर्शनाकडे आकर्षित झाली.

विशेष सेवांचे आकर्षण

खरेदीच्या गर्दीत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष ‘क्लॉक रूम’ आणि विश्रांती कक्षाची सोय होती. कुटुंबीय खरेदी करत असताना ज्येष्ठांना येथे सुरक्षित बसता येत होते, या संवेदनशील निर्णयाचे सर्वत्र कौतुक झाले.

पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या सुविधेमुळे ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कैकपटीने वाढला. २५ किमीच्या परिघात घराच्या दारापर्यंत साहित्य पोहोचवण्याची जबाबदारी ‘उमेद’ने यशस्वीपणे पेलली.

 

हे ठरले प्रदर्शनाचे ‘सरस’ विजेते

प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांचा गौरव करण्यात आला. यामध्ये खालील गटांनी प्रथम क्रमांक पटकावून आपल्या कार्याची मोहोर उमटवली. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

१. खाद्य विभाग केरळच्या एर्नाकुलम येथील ‘नंदनम बचतगट’ (ज्यूस स्टॉल) याने प्रथम क्रमांक मिळवला.

२. महाराष्ट्रातील बेस्ट सेलिंग स्टॉलमध्ये नांदेडच्या समृद्धी समूहाने (मोरिंगा पावडर) राज्यात अव्वल स्थान पटकावले.

३. नाविन्यपूर्ण उत्पादनात जळगावच्या गोपाल कृष्ण समूह (मल्टीमिलेट खिचडी) आणि साताऱ्याच्या ज्ञानज्योती समूह (रोस्टेड भेळ) यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर बाजी मारली.

४. शेतकरी उत्पादक कंपनीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील कोकण कन्या एफपीसी आणि भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील शिखर धारा एफपीसी या दोन्ही संस्थांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

५. इतर राज्यांतून पश्चिम बंगालच्या जीवनसाथी एस. जी. एस. वाय. गटाने (कपडे आणि स्कार्फ) सर्वाधिक विक्रीचा मान मिळवला.

०००

वंदना थोरात/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp