
मुंबई, दि. ७ : वसई पश्चिम येथील चार वर्षीय निरागस बालकाला मारहाण झाली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विघ्नेशच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. सध्या या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याचे पालकांनी सांगितले.
३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सोसायटीच्या आवारात मित्रांसोबत खेळत असलेल्या विघ्नेश अतुल कोंढारे (वय ४) या बालकाला मारहाण झाली. या मारहाणीत विघ्नेशच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
विघ्नेशचे वडील अतुल कोंढारे हे फरशी फिटिंगचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने उपचाराचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. अशावेळी संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने तातडीने दखल घेतली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, बालकाच्या संपूर्ण उपचाराचा खर्च या निधीतून करण्यात येत आहे.
सध्या विघ्नेशवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोफत उपचार सुरू आहेत. या मदतीबद्दल विघ्नेशचे वडील अतुल कोंढारे म्हणाले, “मुख्यमंत्री सहाय्यता निधीने केलेल्या मदतीबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत. या सहाय्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि आता विघ्नेशची प्रकृती स्थिर आहे.”
या घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत विशेष बाब म्हणून मदत करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या सूचनांनुसार संबंधित रुग्णास तत्काळ आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
०००
