
मुंबई, दि. १७: “शिक्षक हा समाज परिवर्तनाचा खरा शिल्पकार आहे” या विचाराला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देणाऱ्या लातूर जिल्ह्यातील दयानंद कला महाविद्यालयाचे शिक्षक प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांना सन 2025 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. ‘शिक्षक म्हणून केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव’ याविषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 19, शनिवार दि.20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ मोबाईल अॅपवर प्रसारित होईल. निवेदक विवेक सौताडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
शिक्षक प्रा. डॉ. जगदाळे यांनी अध्यापनासोबतच संशोधन, साहित्यनिर्मिती आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या कार्यामुळे ते विद्यार्थ्यांसोबतच समाजालाही मार्गदर्शन करत आहेत. परिषदांमधील सक्रिय सहभाग, संशोधन लेखन, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासणे, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रनिर्माणासाठीचे उपक्रम या सर्व कामगिरीसाठी त्यांना यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या समृद्ध प्रवासाबद्दल प्रा. जगदाळे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात संवाद साधला आहे.
०००
जयश्री कोल्हे/स.सं
