
मुंबई, दि. १६ : डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक व अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम शुक्रवार, १७ जुलै रोजी पु. ल कट्ट्यावर आयोजित करण्यात आला आहे. नवीन लघु नाट्यगृह, रवींद्र नाट्य मंदिरच्या मागच्या बाजूला, पाचवा मजला येथे सायंकाळी सहा वाजता ही स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका फैय्याज तसेच पं. राजा काळे, पंडित चंद्रकांत लिमये यांचे कुटुंबीय व इतर मान्यवर पंडितजींच्या आठवणी जागवतील. पं. मुकुंद मराठे, मकरंद कुंडले, अतुल ताडे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पं. चंद्रकांत लिमये यांच्या गुरुकुलातील काही शिष्यांचेही गायन या कार्यक्रमात होणार आहे. तसेच पंडितजींचे काही दुर्मिळ ऑडिओ व व्हिडिओ देखील रसिकांना ऐकायला व पहायला मिळतील.
हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे . शास्त्रीय व नाट्य संगीताच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या या कलावंताला आदरांजली वाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व वसंतराव देशपांडे संगीत सभा, मुंबई या दोन्ही संस्थांकडून करण्यात येत आहे.
0000
संजय ओरके/विसंअ
