Pune | Sun, 15 February 2026

Ad

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Sunil Goyal | 14 views
अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. १८ (जिमाका): मुक्ताईनगर तालुक्यातील, कुऱ्हा काकोडा, जुना बोरखेडा, राजुर, जोधनखेडा, चिंचखेडा या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून शासनातर्फे सर्वोतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

अतिवृष्टी झालेल्या, भागात शेती पिकाच्या नुकसानाची पाहणी करताना येथील शेतकरी व गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार गिरिष वखारे, कृषी, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील ज्या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिके, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा अशा सूचना मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कुऱ्हा गावातील गोरक्षगंगा नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे खचून गेला आहे. या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यासाठी, जिल्हा वार्षिक योजनेतून तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन त्याचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

काकोडा गावातील रहिवासी किरण मधुकर सावळे यांचा पुरामध्ये वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला होता. पालकमंत्री पाटील यांनी मृत सावळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन शासनातर्फे आर्थिक मदत म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

पालकमंत्री पाटील यांनी कुऱ्हा गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गोरक्ष गंगा नदी काठ, बाजार परिसरास भेट देऊन पाहणी केली व गावकऱ्यांशी संवाद साधला. कुऱ्हा शिवारात, मका, कापूस, सोयाबीन या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत देण्यात येईल असे सांगितले. तालुक्यातील, जुने बोरखेडा, राजुर, चिंचखेडा गावामध्ये देखील पालकमंत्री पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून येथील गावकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, मी तुमच्या मदतीसाठी येथे आलो आहे. शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी संबंधित गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp