Pune | Sun, 15 February 2026

Ad

कांदळवन क्षेत्रात पर्यटन विकासाचे नियोजन -वनमंत्री गणेश नाईक

Sunil Goyal | 7 views
कांदळवन क्षेत्रात पर्यटन विकासाचे नियोजन -वनमंत्री गणेश नाईक

ठाणे,दि. १७ (जिमाका): महाराष्ट्राला विस्तीर्ण कांदळवन क्षेत्र लाभले असून या क्षेत्रामध्ये पर्यटन विकास करण्याचे नियोजन असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये वन विभागातर्फे एक दिवसीय वनोपज आधारित उद्योग निर्मिती उपक्रमांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

याप्रसंगी वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, वनबल प्रमुख प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास, वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. श्रीनिवास राव, सामाजिक वनीकरण प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, नेत्रा शिर्के, संकल्प नाईक, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ व्यवस्थापकीय संचालक पी. कल्याणकुमार, कांदळवन कक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव आदी उपस्थित होते.

वनमंत्री नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदळवने आहेत. या कांदळवन क्षेत्रात पर्यटन विकास करण्यात येईल. पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्यात येतील. वनविभागाच्या वतीने वनीकरण सुरूच आहे. यासोबतच जन सहभागातून वनीकरण वाढविणार असून वनराजीचे जतन, संवर्धन आणि संगोपन करण्यात येईल.

वनमंत्री नाईक यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. वनसंपदा आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. प्रदर्शनात वनौषधी, हस्तकला, शेतीपूरक उत्पादने, तसेच वनसंवर्धन आणि रोजगार निर्मितीशी संबंधित माहिती देण्यात आली.

प्रदर्शनामध्ये वनोपज उत्पादने, महाराष्ट्रातील कांदळवनांची माहिती, व्याघ्र प्रकल्प, कांदळवन संवर्धन, प्रस्तावित कांदळवन इत्यादींची माहिती देणारे स्टॉल मांडण्यात आले होते. महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, सह्याद्री, पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, बांबू डेव्हलपमेंट बोर्ड वनविभागाच्या या व अन्य खात्यांनी यात सहभाग घेतला. या उपक्रमांमुळे वनसंवर्धन आणि वनोपजांना बाजारपेठ मिळवून देण्याला बळ मिळेल, असा विश्वास वनमंत्री नाईक यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात वनमंत्री नाईक यांच्या हस्ते ‘महाबांबू कल्प’ ई-कॉमर्स वेबसाईट आणि मोबाईल ॲपचे डिजिटल लाँचिंग, ‘वनामृत’ या ब्रँडखालील जांभूळ मधाचे अनावरण आणि ‘टिशू कल्चर लॅब’चे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी तारपा आदिवासी नृत्य सादरीकरण करण्यात आले. प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp